अमेझॉनला दिलासा, तर रिलायन्स आणि फ्युचर समुहाला मोठा झटका
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने रिलायन्स उद्योगाला मोठा झटका बसला आहे. भारतातील आघाडीचा उद्योग समूह रिलायन्स आणि किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील फ्युचर समूह यांच्यात होऊ घातलेला महत्वाचा करार सुप्रीम कोर्टाने रोखला आहे. सिंगापूरमधील लवादाने दिलेला निकाल भारतातही लागू होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाने अमेझॉनला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे रिलायन्स समूह आणि फ्युचर समुहाला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध फ्युचर समुहाचे भारतातील काही किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसायातील मालकी हक्क रिलायन्स समुहाने विकत घेतले होते. तब्बल २४ हजार ७१३ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, रिलायन्स आणि फ्युचर समुहात झालेल्या या व्यवहाराला अमेझॉन कंपनीने विरोध केला होता.
फ्युचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विलिनीकरणाला सिंगापूरस्थित न्यायालयाने स्थगिती दिली होती. या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी, अशी याचिका अमेझॉनने केली होती. फ्युचर ग्रुपने आपला रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि गोडाऊनचा व्यवसाय रिलायन्सला विकण्याचा करार केला होता. तसेच फ्युचर समुहाच्या कंपनीत अमेझॉनची ४९ टक्के मालकी आहे. त्यामुळे या व्यवहारानुसार जर कंपनी विकली जाते. त्यावेळी ती खरेदी करण्याचा अधिकार अमेझॉनकडे येतो. पण, रिलायन्स-फ्युचर करारात याचे पालन झालेले नाही, असे अमेझॉन म्हटले होते.