मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नाना पटोलेंवर बोचरी टीका करत, लहान माणसांबद्दल मी काय बोलणार असे म्हटले. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचा आरोप भाजपाने केला. त्यातच, पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही नाना पटोलेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन होऊद्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनंही नाना पटोलेंना लहान म्हटलंय. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जलभूषण पुरस्कार सन्मान सोहळ्यावेळी बोलताना नाना पटोलेंना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढताना, थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा चिमटाच काँग्रेस नेत्यांना काढला आहे.
जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आघाडीचे मंत्री उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचं भाषण झालं. या भाषणात पवारांनी जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून जोरदार बॅटिंग केली. दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढताच सभागृहात एकच हंशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच सारवासारव केली. स्वबळाचा अर्थ असा नका समजू. म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असं काही छापून यायचं, असं काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवार म्हणाले, तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?
काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतं. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षातील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा सवाल पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काँग्रेस नंबर वन असेल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वबळावर लढण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू… आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ… महाराष्ट्र काँग्रेसचं राज्य आहे… भविष्यात तुम्हाला कळेल, २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची फरफट
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिथे नेमकी काय चर्चा झाली. हे माहीत नाही. पटोले यांनी त्यांच्या मनातील आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना सांगितली. कितीही काही केलं, काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तिन्ही पक्षात अंतर्गत काय चाललं हे लोकांना कळून चुकलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एका बाजूला असून काँग्रेस एकटी पडलेली दिसत आहे. काँग्रेस फरफटत जात आहे की काय असं दिसत आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.