Top Newsराजकारण

डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार : उद्धव ठाकरे

मुंबई: आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची मंत्रिमंडळ बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून घेऊ. राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचे अर्थखाते त्यांच्या पाठीशी आहे. पर्यटन विभागाचा मंत्री माझाच मुलगा आहे आणि आदित्य ठाकरेचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका पर्यटनाला बसला. या काळात निर्बंध असतानाही नवे धोरण आणले, नव्या सुविधा निर्माण केल्या, नवे रोजगार तयार केले, याचा मला अभिमान आहे. या विभागाचा मंत्री माझाच मुलगा आहे. केवळ यासाठी नाही, तर मी पर्यटन विभागाचे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. हे फोटो प्रदर्शन महाराष्ट्राच्या वैभवाचे, ऐश्वर्याचे प्रदर्शन आहे. दुर्दैवाने या खात्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता त्याला चांगले महत्त्व दिले जात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथे पोहोचून परतीचा प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतले पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

देशभरात जेवढ्या लेण्या आहेत, त्यातील सर्वाधिक म्हणजे १२०० पैकी ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील ९० टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुने जतन करणे नाही तर नवेही तयार केले पाहिजे. बार्सिलोनामध्ये पुरातन काळापासून निर्माण केले जाणारे चर्च आहे. त्यात सुरुवातीपासून आजपर्यंतच्या शैलीचे काम पाहायला मिळते. महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button