तुम्ही सीएम मेटेरियल आहात, राज्यमंत्र्यासारखं वागू नका; सभागृहात भाजपाची शिवसेना नेत्याला गुगली
मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपात बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत, यातच शिवसेनेत दुसरं कोणी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे का? अशी चर्चा भाजपा नेत्याच्या विधानानं होऊ लागली आहे.
विधानसभेत भर सभागृहात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उल्लेखून तुम्ही सीएम मेटेरियल आहात, असं विधान केलं, त्यामुळे मुनगंटीवारांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा रंगली. सोमवारी वैधानिक विकास मंडळावरून सत्ताधारी आघाडी सरकारला सुधीर मुनगंटीवार यांनी धारेवर धरलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारवर आरोप केले.
१५ महिने उलटले तरीही आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही, सरकार अधिकाऱ्याला वाचवण्याचं प्रयत्न करतंय, अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नाही असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला, त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, चौकशी अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू असं प्रत्युत्तर दिलं, त्यावरून मुनगंटीवारांनी तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, एखाद्या राज्यमंत्र्यांप्रमाणे वागू नका असं म्हटल्याने सगळेच आवाक् झाले.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्र्यांशी वीस मिनिटं बंदद्वार चर्चा करून आले. ‘शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा शत्रू नाही’, असं माध्यमांकडे बोलले. त्यातच सत्तेचा फॉर्म्युला तयार आहे, फक्त बटण दाबायची देरी आहे’ असं भाजपाचे काही नेते सांगत असतात.
वैधानिक मंडळावरूनही सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घेरलं
वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? इतके दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमवारी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधलं. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असं पवार म्हणाले.