मुंबई : नागपूरमधील नागभीड उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्तीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे असे सांगताना नितीन गडकरी यांचे कौतुक केलं आहे. तसेच नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या आधुनिक टेक्नोलॉजिची राज्याला गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमादरम्यान कौतुक केलं आहे.
नागपुरात कडबी-गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात येत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं तुम्ही जोडली आणि आता त्याचे अंतर कमी करुन अजून जवळ आणत आहात असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, स्वप्न पाहायला धाडस लागतं पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागत, तुमच्या जागी दुसरा कोणी असते तर पाहतो, बघतो असे म्हटलं असते पण तुम्ही तात्काळ सांगितले की, मी करतो आणि ते तुम्ही करुन दाखवलं आहे. तुम्हीच तुमच्या कर्तृत्वाने देशाला ओळख करुन देत आहात त्यासाठी मला अभिमान आहे. तुमची पुढील वाटचाल अधिक गतीने व्हावी अशी शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील काही ठिकाणी कायमस्वरुपी किती पाऊस पडला तरी बाधा येणार नाही असे काम केले पाहिजे. हा नागभीडचा प्रस्ताव आला होता तेव्हा अशी विनंती केली होती की जिथे जिथे जंगल असेल तिकडे पुणे-मुंबईसारखा उन्नत मार्ग तयार करावा, तसेच प्राणघातक रेल्वे फाटक जिवघेणे ठरु नये यासाठी उड्डाणपुल तयार करण्यात येत आहेत. सृष्टी आणि पर्यावरणाला बाधा येऊ न देता काही मार्ग उन्नत मार्ग करु शकलो तर वनसंपत्ती तशीच राहील आणि वरुन प्रवास करताना जंगल पाहणं सुखद ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशा मार्गासाठी खर्च खूप लागेल परंतू सध्या आपत्ती उद्भवल्यावर त्यापेक्षा अधिक खर्च येत आहे त्यामुळे अताच खर्च करुन कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.