मुख्यमंत्री आक्रमक; शिमग्यानंतर प्रशासन आणि मंत्रिमंडळात बदलाचे संकेत
आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढणार!
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंगच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. अशाप्रकारे फोन टॅप होत राहिले तर अधिकाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढायला हवेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांच्या विरुद्ध भाजपने आक्रमकपणे आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्यात. भाजपच्या आक्रमक आरोपांमुळे राज्य मंत्रिमंडळात तसेच प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत.
मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून परस्पर फोन टॅप करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ खडबडून जागे झाले आहे. परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे सरकारकडून (Thacekray govt) रणनीती आखली जात आहे. विरोधी पक्ष भाजपने आरोप केलेले वनमंत्री यांनी आधीच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच भाजपने लक्ष केलं आहे. त्यांच्या आरोपांना आता कुठं महाविकास आघाडीने तोडीस तोड उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. सव्वा वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं. त्यावेळी राज्यात आधीच्या भाजप सरकारने नियुक्तं केलेले समर्धक IAS आणि IPS अधिकारी कार्यरत होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर या समर्थक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी काहीच झालेली नाही. त्यामुळे सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तर प्रशासकिय अधिकारी मात्र भाजपने नियुक्त केलेलेच होते. त्याची झळ आता महाविकास आघाडीला बसू लागलीय.
महाविकास आघीडीतील मंत्र्यांवर एकामागोमाग भाजपचे नेते गंभीर आरोप करत आहेत. त्या सर्व आरोपांची माहिती देणारे सूत्र हे वरिष्ठ अधिकारीच आहेत हे आता सत्ताधारी महाविकास आघीडीतील नेत्यांना कळून चूकलंय. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागातील खडानखडा माहिती विद्यमान गृहमंत्र्यांच्या आधीच मिळवली होती. त्यांनी सभागृहात CDR आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण संदर्भातील माहिती जाहीर करून गृहमंत्र्यांना कोंडित पकडलं होतं. त्यामुळे विरोधी पक्ष नेते असुनही देवेंद्र फडणवीस यांचा गृह विभागावर आजही किती वचक आहे याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आली आहे. त्यामुळे आता गृहविभागावर वचक आणि वकुब निर्माण करेल असा चेहरा देण्याचं महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच येत्या होळी पोर्णिमेनंतर राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाचा पत्ता कट होतोय आणि कुणाची वर्णी मंत्री मंडळात लागतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नवीन मंत्रिमंडळासोबतच महाविकास आघाडी सरकार आता राज्य प्रशासनातील भाजप समर्थक IAS आणि IPS अधिकाऱ्यांनाही बदलणार का..? तेही पहाणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आता महाविकास आघाडीची जनमानसातील प्रतिमा उंचावणं हे विश्वासू प्रशासनावर देखील अवलंबून असणार आहे.