राजकारण

बुलडाण्यात शिवसेना – भाजप कार्यकर्ते भिडले; भाजपच्या माजी आमदाराला जबर मारहाण

बुलडाणा: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करणं भाजप नेत्यांना चांगलंच भोवलं आहे. गायकवाड यांचा पुतळा जाळताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपच्या माजी आमदाराच्या डोळ्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा डोळा सुजला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात तणाव निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती. यावेळी गायकवाड यांचा तोल सुटला होता. त्यामुळे भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात येऊन गायकवाड यांचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांनी त्याला विरोध केला.

कुणाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केल्याने दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडून प्रकरण हमरीतुमरीवर आलं. ही शाब्दिक चकमक अधिकच वाढली आणि प्रकरण हाणामारीवर आलं. दोन्ही गटांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या डोळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा डोळा सुजला. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलीस आणि जवानांनी दोन्ही गटाला पांगवून तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणलं. दोन्ही गटातील हाणामारी थांबली असली तरी परिसरातील वातावरण अजूनही तापलेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही गटांवर संचारबंदीचा भंग, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button