मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ३ पक्षांची मोट बांधून राज्यात सत्ता स्थापना झाली. महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्ष होत आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद प्रथमच चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे केली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमकणू करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचं बोललं जातंय. सरकार अंतर्गत सुरु असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांची ही अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरुन सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या सरकारच्या काळात किंवा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात थोड्या कुरबुरी, नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पण आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठिणगी पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
जयंत पाटील यांचे म्हणणे काय?
राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या कामकाजावर नाराजी दर्शवली होती. कॅबिनेट बैठकीत जयंत पाटील यांनी मुख्य सचिव कुंटे यांना प्रश्नांची सरबत्ती करत मंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार आपणाला कुणी अधिकार दिलेत? असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला होता.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेत मुख्य सीताराम कुंटे यांच्यावर कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे की, कामकाज करत असताना कोणावर राजी नाराजी धरायची नसते. त्या- त्या वेळी तो-तो विषय असतो. एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर राजी-नाराजी हा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे कोणावर नाराजी असण्याची काही आवश्यकता नाही आणि गरजही नाही. जी गोष्ट घडते ती त्या वेळी बोललेली बरी असते असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळात काय चर्चा झाली असा प्रश्न केला असता, मंत्रिमंडळातल्या चर्चा ही सरकारची अंतर्गत बाब असते. त्याबाबत काही बोलायचे झाल्यास मुख्यमंत्र्यांशी आवश्यकता असेल तर बोलेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नदीत मृतदेह आढळल्याची घटना धक्कादायक
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक वाढलेले असावे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळत आहेत याचा अर्थ तेथील कोरोना परिस्थिती फार वाढली आहे आणि ही घटना धक्कादायक आहे. ज्या नदीत मृतदेह आढळले त्या नदीच्या पाण्यावर पुढे करोडो लोक अवलंबून आहेत. आपल्या भारतात अशी घटना कधी झाली असेल ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या देशात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. तेथील सरकारचे हे अपयश आहे सरकारला काही कमतरता असतील किंवा स्मशान भूमित जागा नसेल म्हणून थेट नदीत मृतदेह सोडण्यास सुरुवात केली आहे हे अत्यंत क्लेशदायी असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.