आरोग्यराजकारण

नाशिकमध्ये कोरोना आढावा बैठकीत भुजबळ-भाजप आमदाराची शाब्दिक चकमक

नाशिक : नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह स्थानिक आमदार खासदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच वाढत्या रुग्णसंख्येबाबत लोकप्रतिनिधींची मतं घेतली.

मात्र या बैठकीदरम्यान देवळा-चांदवड विधानसभेचे भाजप आमदार राहुल आहेर आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. भाजप आमदार राहुल आहेर यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. नाशिक जिल्हा रुग्णलयात बेड वाढवले जात नाहीत, काही बेड पडून आहेत, तर कळवणच्या ग्रामीण रुग्णलयात सिटी स्कॅन मशीन धूळखात पडून आहे. त्याचा वापर का केला जात नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर छगन भुजबळांनी सूचना करा म्हणून सुनावलं यावेळी चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

यावर आमदार राहुल आहेर यांना माध्यमांनी शाब्दिक चकमकीबाबत विचारलं असता त्यांनी, ही आमची सर्वांचीच भूमिका असल्याचं म्हटलं. पालकमंत्री यांच्यासह सर्वांनाच वाटतं की परिस्थिती सुधारली पाहिजे, मात्र काही अधिकारी माहितीबाबत दिशाभूल करत असल्याची शक्यता वाटते. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात अ‍ॅडमिट करून घेतलं जातं नाही. त्यामुळे रुग्णांची परवड होते. लसीसंदर्भातही ग्रामीण भागात पुरेशी जागरुती झालेली नाही. त्यामुळे अनेक नागरिक लस घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत पावलं उचलली पाहिजे, असं राहुल आहेर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button