राजकारण

खा. प्रिन्स राज पासवान यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; चिराग पासवान यांचेही नाव

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूरमधून लोकसभेवर निवडून गेलेले लोक जनशक्ति पार्टीचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये चिराग पासवान यांचेही नाव आल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जवळपास तीन महिन्यांपूर्वी एका पीडित तरुणीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता न्यायालयाचा आदेश आल्याने खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर ९ सप्टेंबरला नोंदविण्यात आला आहे. पीडितेने प्रिन्स राज यांच्यावर तिचा अश्लिल व्हिडीओही बनविल्याचा आरोप केला आहे. बलात्कारानंतर वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी देण्यात आली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांत न जाण्यासाठी धमकविण्यात आले होते, दबाव टाकण्यात आला होता. प्रिन्स हे चिराग पासवान यांचे चुलत भाऊ आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस पासवान यांचे पुतणे आहेत.

एफआयआरमध्ये चिराग पासवान यांचे नाव आले आहे. तिने चिराग पासवान यांना या घटनेबाबत सांगितले होते. तेव्हा चिराग पासवान यांनी काहीही एकून घेतले नाही. जेव्हा पोलिसांत जाण्याचे सांगितले तेव्हा चिरागने मला भेट दिली आणि कोणताही गुन्हा दाखल करू नको असे सांगितले. चिराग पासवानने पक्षाचा अध्यक्ष या नात्याने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पीडितेने केला आहे.

ही पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. प्रिन्सने देखील तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये तिने चुकीचे आरोप केल्याचे म्हटले आहे. चिराग आणि पशुपती यांच्यात जेव्हा पक्षावरून ओढाताण सुरु होती तेव्हा चिराग यांनी पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button