बीजिंग : लोकसंख्या नियंत्रणाचे अतिशय कडक धोरण राबविणाऱ्या चीन सरकारने त्यातून जनतेला काही सूट दिली आहे. आता चिनी दाम्पत्यांना तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी दोन अपत्येच जन्माला घालावीत, असे बंधन चिनी नागरिकांवर लादण्यात आले होते.
चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्याला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असला, तरी तिथे जन्मदराच्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात चीनचे लोकसंख्या संतुलन बिघडू शकते. हा धोका लक्षात आल्यानेच दांपत्यांना दोनऐवजी आता तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वाढत्या महागाईमुळे व कायद्याच्या बंधनांमुळे चिनी दांपत्य कमी मुले जन्माला घालतात. एकापेक्षा अधिक मुले असतील, तर त्यांच्या संगोपनाचा खर्च खिशाला परवडत नाही, असे बहुसंख्य दांपत्यांचे मत आहे. ‘चायना डेली’ या चीन सरकारच्या मुखपत्राने म्हटले आहे की, लहान मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण यावरील खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी चीन सरकारने काही उपाय योजले आहेत. मुलांचे संगोपन व शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाटी सरकारने विशेष उपाययोजना केली आहे. तीन अपत्ये असलेल्यांना कर, विमा, शिक्षण, निवासस्थान, रोजगार, आर्थिक उत्पन्न यात भरघोस सवलती दिल्या आहेत.
चीनमध्ये लोकसंख्या आणखी प्रचंड प्रमाणात वाढू नये, यासाठी एकच मूल जन्माला घालावे, अशी सक्ती दांपत्यांवर याआधी करण्यात आली होती. १९७९ ते २०१५ या काळात राबविण्यात आलेल्या या धोरणामुळे चीनचे खूप नुकसान झाले. या धोरणामुळे ४० कोटी अपत्यांचा जन्म होऊ शकला नाही, असा दावा आता चीन सरकारनेच केला आहे.