रंग आणि त्यांची अनुभूती घेणं हा लहान मुलांचा स्थायी भाव आहे. हातात रंग आले की, त्याच्या रेघोट्या मारणं ही एक त्यामधील नैसर्गिक प्रक्रिया होऊन जाते. आपल्या आयुष्यात कोणती ना कोणती कला आली पाहिजे असं आधीच्या पिढीतले प्रत्येक जण म्हणत असत. नावीन्य, सर्जनशीलतेचा जन्म कलेच्या कुशीमधून होत असतो. म्हणूनच चित्रकला ही सर्व मुलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. लहानपणापासूनच हातात जे पडेल त्यातून मुलं प्रयोग करायला सुरुवात करतात.
मोठ्यांनी पेन हातात धरलेला पाहिला की, लगेच मुलांनाही तो हवा असतो मग, कागदावरती त्यांच्याकडून रेघोट्या अवतरायला सुरुवात होते. वेगवेगळे ठसे तयार करणे, पेन उघडून, उकलून पाहणे, शाई कशी बाहेर येते ते तपासणे, हे केवढं मोठं संशोधन करण्यामध्ये मुलं मग्न होतात. मुलांचे वय जसजसे वाढत जाते तसतशा या कागदावरच्या, भिंतीवरच्या खुणा अर्थपूर्ण बनू लागतात. चित्रांच्या माध्यमातून मुलांची जगाबद्दलची समज वाढत जाते. बालविकासातील अभ्यासकांच्या मते अगदी दहा महिन्यांच्या बाळाला देखील चित्रे काढण्याची संधी दिली पाहिजे, कारण शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मूल चित्राद्वारे संवाद साधते. त्याची अभिव्यक्ती त्यातून उतरत असते.
एखादं मूल चित्र काढतं म्हणजे ते कागद, रंग किंवा पेन्सिल वाया घालवत नाही किंवा त्या नुसत्या रेघोट्या नसतात तर ख-या अर्थाने मूल चित्र पंचेंद्रियांनी अनुभवत असतं. मुलांनी पाहिलेले विविध रंगांतील आकार त्यांना कमालीचा आनंद देतात. त्यातील एखादा भाग निरागसपणे रेखाटताना ते देहभान विसरून जातात. तर कधी स्वत:चा आनंद, त्यांना होणारा त्रास ते व्यक्त करत असतात. कधी कधी मूल एकच एक रंग निवडतं, कधी कधी मुलं फिकट रंग निवडतात. याचा अर्थ त्यांची एनर्जी लेव्हल सध्या तरी तेवढी जास्त नाही शिवाय मनोवस्था तेवढी आनंदी नाही हे स्पष्ट होतं. बालभवनात मुलं विविध रंगांच्या छटा अनेकदा चित्रातून साकारतात. मुलांच्या चित्रात मोठी माणसं असतात तर कधी खूप लहान लहान अगदी गोळा, टिंब असलेली इवलीशी देखील माणसं दिसून येतात.
स्वित्झर्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी मुलांच्या चित्र काढण्याच्या शैलीवरून त्यांचा आयक्यू आणि भावावस्था समजण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावरून आपण जे खेळ आणि शब्दाद्वारे सतत व्यक्त करतो, तेवढाच संवाद मुलं चित्रांच्या माध्यमातून जगाशी करतात हे पुन्हा पुन्हा सिध्द झालं. जी मुलं सारखी बडबडत असतात, त्यांच्या चित्रातला चेहरा मोठा आढळून आला, ज्या मुलांना डोळ्यांच्या धाकाने नियंत्रित करण्यात आलं, त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये चित्राच्या तुलनेत डोळे मोठे रेखाटले. ज्या मुलांच्या इच्छांचे दमन झाले त्यांच्या चित्रांमध्ये मान अगदी उंच दिसून आली. चित्रातील पसरलेले दोन्ही हात जगाशी संवाद आंतरक्रिया करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसले. तर ज्या मुलांचा बालपणात लैंगिक छळ झाला त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये हमखास हात नसलेल्या चित्रांना प्रकर्षाने रेखाटलं होतं. म्हणजे हातांनी प्रतिकार करता येतो पण माझ्या हातामध्ये तेवढी खरं तर ताकद नाही हे सांगण्याचा केवढा महत्त्वाचा प्रयत्न होता तो. खरं तर चित्रांची भाषा ही जागतिक भाषा आहे. ती जगातल्या कोणत्याही माणसाला जोडून ठेवते.
आपल्या मुलांनी काढलेली चित्रं कशाची आहेत, त्यामध्ये नेमकं त्याला काय म्हणायचं आहे, हे पालकांनी आवर्जून विचारावं. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी ती खूप मोठी संधी असते. खरं तर मुलांच्या चित्रांतून त्याला काय अभिव्यक्त करायचं आहे, याचा अलीकडे खूप जास्त शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात आहे. अचानक एके दिवशी सर अमनच्या घराच्या रस्त्याच्या बाजूने जाताना दिसले. अमन पळत सरांच्या गाडीकडे आला. पण लगेच थबकला, सरांनी त्याला विचारलं, ‘‘अरे इकडे कसा काय?’’ मनाने थिजलेल्या अमनने हाताने दाखवले, म्हणाला, ‘सर ते माझं घर..’ सरांनी पाहिलं ते लांब रस्त्याच्या कडेला ठोकलेले पाल होते. आज त्यांना समजलं अमनच्या चित्रात घर का येत राहिलं ते. घरात असणारी स्थिरता, सुरक्षितताच जणू काही अमन त्याच्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करत राहिला.
अनेकदा आपण मुलांना टोकतो, हे काय काढलंस? पण तसं खरं तर न म्हणता त्याचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न करावा. त्यातून एखादी गोष्ट, एखादा अनुभवाचा प्रत्यय येऊ शकतो. मुलांना त्यांच्या वाढत्या वयात चित्रांची जादू अनुभवता आली तर तो त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचा ठेवा होऊ शकतो. मुलांच्या भावविश्वाची ओळख आपल्याला होते. एवढंच नाही तर त्याची जगाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आणि दृष्टिकोन यांचे आकलन समोर येते. मुलं प्रगल्भ होतात. बौध्दिक विकासासह त्यांच्यातील कुतुहल उजागर होते.
खरोखर बालपणातील हा चित्रकलेचा काळ फार मौल्यवान आहे, तो आपण पालकांनी काळजीने सांभाळायला हवा. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे हळूहळू वय वाढत जातं आणि चित्रकला मागे पडत जाते. मुलांची माणसं करताना नकळत आपण त्यांच्यातील कलेला मारत जातो. मग दिलेले ठोकळे रंगवत राहणं, अभ्यासात काय विचारलं जाईल, परीक्षेत काय येणार आहे? हा ध्यास या चित्रांपेक्षा मोठा होत जातो. या मार्कांच्या मोजमापात अमूल्य असलेलं मुलांचं भावविश्व त्याच्या आयुष्यातून हिरावून घेत असतो. हे असं आपलं पालक म्हणून वागणं कसं चालेल?? याचा विचार करणं अत्यावश्यक आहे. अलीकडे चित्रकलेच्या माध्यमातून उपचार करण्याची पध्दती अधिक विकसित होत आहे. त्याच्यावर खूप सारं विविध पध्दतीने संशोधनही सुरू आहे.
आपण मात्र ठराविक चौकोनातलं शिक्षण आणि अभ्यास त्याचे पाठांतरामध्ये झालेले रुपांतर हा अत्यंत कंटाळवाणा झालेला प्रघात अधिक अधोरेखित करत आहोत का हे पुन्हा नव्याने तपासायला हवे. कारण मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी त्यांच्या निरागसतेला प्रकट होण्यासाठी जगाच्या पाठीवरती चित्रांसारखी अन्य भाषा नाही म्हणूनच जगप्रसिध्द फ्रेंच चित्रकार पिकासो नेहमी म्हणत की,‘‘ मोठ्या चित्रकारांसारखी वास्तववादी चित्रशैली आत्मसात करायला काही वर्षांची मेहनत पुरते, परंतु लहान मुलांसारखी चित्रं काढायचा मी आयुष्यभर प्रयत्न करत राहीन.’’ चला तर मग मुलांच्या रेघोट्यांना अधिक रंजक करूयात.