मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितली असून आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.
भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत. तसेच पुढील १५ दिवस गैरहजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितला असल्याचंही इंद्रपाल सिंग यांनी सांगितलं. भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे.
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, ४३ कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.