मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा आणि मानदुखीचा त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. पण, आता त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले आहे. प्रख्यात स्पाईन सर्जन शेखर भोजराज शस्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर शस्रक्रिया होणार आहे. मानेजवळील मणक्यावर ही शस्रक्रिया केली जाणार आहे. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्रक्रिया होणार आहे. प्रख्यात स्पाईन सर्जन शेखर भोजराज शस्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या ४ ते ५ दिवसात शस्रक्रिया होऊ शकते, असंही सांगण्यात आलं आहे. सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला हजर झाले होते. यावेळी मानेला दुखापत झाल्यामुळे गळ्याला पट्टा लावून उद्धव ठाकरे पाहण्यास मिळाले होते.