मुंबई : महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आता केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना केलं आहे. भाजप दबावाचे राजकारण करत आहे. भाजपचे नेते रोज महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत आहेत. मी एकट्याने त्यांना उत्तर देण्यापेक्षा इतरांनीही बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.