केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा राजीनामा
नवी दिल्ली: भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुब्रमण्यम यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘माझा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आता मी माझ्या अॅकेडमिक फिल्डमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची सेवा करणे माझ्यासाठी खूप गौरवाचे होते.’
सुब्रमण्यम पुढे म्हणाले, ‘भारताची सेवा करण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दररोज जेव्हा मी नॉर्थ ब्लॉकला जात असे तेव्हा मी स्वतःला या जबाबदारीची आठवण करुन देत असे. मी माझे कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. सरकारकडून नेहमीच काम प्रचंड प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला आहे.
ते पुढे म्हणतात की, ‘माझ्या ३० वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व कधीच पाहिले नाही. आर्थिक धोरणांची त्यांची अंतर्ज्ञानी समज सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्याचा त्यांचा निर्धार दर्शवते. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही मला नेहमी पाठिंबा दिला. निर्मला सीतारामन यांची विनोदबुद्धी आणि त्यांच्या काम करण्याची शैली देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे.’