Top Newsराजकारण

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा आज शपथविधी

चंदिगढ : कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चरणजीत सिंह चन्नी यांना जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित शीख चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. चन्नी सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चन्नी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर चंदिगढमधील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिंह सिद्धू आणि पंजाब कांग्रेस प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. राज्यपालांशी जवळपास अर्धा तासाच्या भेटीनंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी राजभवना बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या शपथविधीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आज सकाळी ११ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले की, हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत.

काँग्रेसच्या या निर्णयाला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी जोडून पाहिले जात आहे. राज्यात दलित लोकसंख्या तीस टक्क्यांहून अधिक आहे. त्याचबरोबर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button