मुंबई : कसोटी मालिकेनंतर १९, २१ आणि २३ जानेवारीला भारतीय संघ तीन वन डे सामने आहेत. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू आजच दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले. पण, वॉशिंग्टन सुंदरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले. त्यामुळे बीसीसीआयनं भारतीय संघात दोन बदल केल्याचे बुधवारी जाहीर केले.
वॉशिंग्टन मागील १० महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्च २०२१मध्ये तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेरच आहे. त्यानं दुखापतीतून सावरल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानंतर त्याला वन डे मालिकेसाठी निवडण्यात आले. पण, आता कोरोना झाल्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
भारताच्या निवड समितीनं सुंदरच्या जागी फिरकीपटू जयंत यादव याची वन डे संघात निवड केली आहे. जयंत सध्या कसोटी संघासोबत आफ्रिका दौऱ्यावरच आहे. बीसीसीआयनं त्याला वन डे मालिकेसाठी तेथे थांबण्यास सांगितले आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही आणि त्यामुळे त्याला बॅक अप म्हणून निवड समितीनं नवदीप सैनीची वन डे संघात निवड केली आहे. दुसऱ्या कसोटी दरम्यान सिराजला दुखापत झाली होती.
भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.