गोकुळ दूधसंघात ३० वर्षांनंतर सत्तांतर; सतेज पाटलांची महाडिकांना धोबीपछाड
कोल्हापूर: गोकुळ दूधसंघावर जवळपास तीन दशकांनंतर सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला मोठं पराभव पत्करावा लागला. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीमुळे अख्ख्या कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं होतं. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवत दबदबा निर्माण केला आहे.
तीन दशकांनंतर कोल्हापुरात दूध संघात परिवर्तन झालंय. या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं बाजी मारली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २१ पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं. या निमित्तानं आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली.
गोकुळ दूधसंघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी ३६५० पात्र सभासद होते, मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू होती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा स्पष्ट कौल हाती आला. सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान देत विजय संपादन केला.
शेतकऱ्यांना थेट २ रुपये दरवाढ
या विजयानंतर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी शेतकऱ्यांना थेट २ रुपये दरवाढ देऊन टाकली. सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलीय. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झालाय. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलंय. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं, यावरून आम्ही निवडून आलोय. आता नवा अजेंडा असणार आहे, असंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय.
मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार
विशेष म्हणजे आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून, आमच्या शब्दात कोठेही मागे पडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही २ रुपये दर वाढवून देणार आहोत. प्रस्थापित व्यवस्थेतील उणिवा दूर करायच्यात, आम्ही मोठी धडक दिली, जिल्ह्यातून आमचं कौतुक होतेय. चार जागा गेल्या याचं पॅनल प्रमुख म्हणून दुःख होतेय, पण लोकशाही आहे. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होतं, असंही सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले.