राजकारण

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षण गेलं. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगून ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतााच राज्य सरकार विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

किमान सहा जिल्ह्याचा डाटा तयार केला असता तर तिथे आरक्षण देता आलं असतं. सहा महिन्यात राज्य सरकारने काय केलं? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं. पण राज्य सरकारने काहीही केलं नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नागपूर शहरात उद्या सहा ठिकाणी भाजपचं धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सहा विधानसभा मतदार संघातही आंदोलने होतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते या आंदोलनता सहभागी होतील, असं सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची अप्रत्यक्ष बाजू घेत सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार यांना छोटं खातं देऊन या सरकारने त्यांची गोची केली आहे. ओबीसी मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी ढकलण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री काहीही करत नाही. काँग्रेसवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यावरूनही बावनकुळे यांनी पटोले यांना घेरलं. नाना पटोले यांचे आरोप हास्यास्पद आहेत. त्याचं सरकार आहे, मग ॲडव्होकेट जनरल आमच्या मताने कसे चालणार?, असा सवाल त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? भाजपचा सवाल

ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी १५ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. तशी घोषणाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

संजय कुटे आणि टिळेकर यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही कुटे व टिळेकर यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button