राजकारण

शिवसेनेची दंडुकेशाही चालू देणार नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का? असा सवाल करतानाच या देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना भवनासमोर जे झालं ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणं हे क्लेशदायक आहे, असं सांगतानाच तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला. काल झालेला राडा हा मुंबई महापालिकेची तयारी नव्हती, तो भावनिक प्रश्न होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून अंतर निर्माण झालं. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसं सहन होईल? ही लोकशाही आहे. त्यामुळे तुमची दंडुकेशाही नाही चालणार. आंदोलकांच्या हातात दगड, गोटे नव्हते. जे काही असेल ते सीसीटीव्हीत येईलच, असं सांगतानाच १५ दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवलं नाही. पोलीस आले. आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्यांना घेऊन गेले, असं त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. विशेष अधिवेशनात आरक्षणावर सांगोपांग चर्चा करता येईल. आमदारांना आपली मते आणि काही फॉर्म्युले देता येतील. त्यातून चांगला मार्ग निघू शकतो. रुटीन अधिवेशनात केवळ तीन साडेतीन तास चर्चा होते. त्यातून काही निष्पन्न होत नाही, सर्वांना बोलताही येत नाही, असं सांगतानाच विशेष अधिवेशन मागता मागता रुटीन आरक्षण आलं आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. निवडणूक घोषित झाली की बसून ठरवू, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button