Top Newsराजकारण

पुण्यात गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार

पुणे : पुणे महापालिकेचा निवडणूक आखाडा सज्ज होतोय. राजकीय मल्लांच्या जोर बैठका सुरु झाल्यात. पुण्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची भेट झाली. तर संध्याकाळी चंद्रकांंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात काल (बुधवार) चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहर भाजपतील महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पण कार्यकर्त्यांबरोबर गँगस्टर गुंडांच्या सौभाग्यवतींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याचबरोबर संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संतोष लांडेची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. भाजपच्या कार्यक्रमात गुंडाच्या सौभाग्यवतींनी हजेरी लावल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात काही मिनिटांत सुरु झाली. प्रसारमाध्यमांनी या बातम्या दाखवल्यानंतर चंंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. आम्ही कुणालाही पास दिलेले नव्हते. त्यांनी शक्तिप्रदर्शन का केलं हे त्यांना विचारा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी याविषयी अधिक बोलणं टाळलं. मोहोळ आणि लांडे यांच्या सौभाग्यवतींच्या भाजपप्रवेशावर चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, सध्या पक्षात प्रवेश देण्यासाठी कोअर कमिटी आहे. ती निर्णय घेईल. आत्ता त्यांना प्रवेश देण्याबाबत कुठलाही निर्णय नाही. केवळ कोथरूडच्या आमदारांच्या चांगल्या कामाच्या कौतुकासाठी ते (गुन्हेगार सौभाग्यवती) आले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

येत्या दोन ते महिन्यांत राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे महापालिकेची निवडणुकही होणार आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुण्यात राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. मग नेते-पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असोत, बैठक असोत वा सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी…! पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते झटकून कामाला लागलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button