नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपमधील काहीजण वैफल्यग्रस्त झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तेव्हा एका लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवला नाही. परंतु आता एखाद्या आरोपीने आरोप केल्यावर विश्वास ठेवत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी अजित पवार यानी म्हटलं की, एक जो आरोपी जेलमध्ये आहे. त्या आरोपीने सांगितले आहे असं सांगितले जात आहे. ज्या आरोपीने पोलीस सेवेत असताना पोलिसांच्या कामाला डाग पाडला आहे ती व्यक्ती सांगत आहे. अशा सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा का? माझा चंद्रकांत पाटील यांना सवाल आहे. ज्यावेळी चंद्रकांत पाटील बांधकाम खात्याचे मंत्री होते. तत्कालीन महसूल मंत्री होते. त्यांच्याकडे महसूल खातं होत नंतर त्यांच्याकडे सहकार खातं होते त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापुरचे पालकमंत्री असताना स्थानिक शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर खुप काही आरोप केले होते. ३ लाखांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे एकले नाही परंतु आता एका आरोपीने तक्रार केल्यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.
लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यावर दुर्लक्ष करायचे आणि एखाद्या आरोपीच्या तक्रारीवर लक्ष द्यायचे उद्या एखादा आणखी एक आरोपी काहीतरी आरोप करेल मग यामध्ये काय तथ्य समजायचे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. काय झालंय चंद्रकांत पाटील आणि काही माणसं वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना दुसरे काहीही सुचत नाही. आम्ही पहिल्यांदा बघतो आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून अनेकवेळा कार्यकारिणी, अधिवेशनं झाली परंतु कुठल्याही पक्षाच्या अधिवेशनात अशा प्रकारचे ठराव झाल्याचे पहिल्यांदाच पाहिले आहे. त्यांनी काय करावं हे त्यांचा अधिकार आहे. जो आरोपी म्हणून आतमध्ये आहे आणि ज्याने मुंबई पोलिसांना अडचणीत आणलं त्या माणसाच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा आणि काय करायचे हे जनतेनं ठरवावं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सरकार ५ वर्षे टिकणार
तुम्ही पण पत्रकार म्हणून काम करत असताना तुम्हाला पण वाटत असावं आपण प्रमुख व्हावं, संपादक व्हावं परंतू तस होत नाही केवळ एकच माणूस होतो. १४५ लोकांपैकी एकच जण मुख्यमंत्री होतो आणि तो आम्ही बसवला असून तो ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सवालच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या प्रमुख नेत्यांना एकत्र निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हे नेते सांगतील तोपर्यंत हे सरकार टिकणार आहे. सरकार पूर्ण ५ वर्ष काढणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. काही ना काही अस्वस्थता करणाऱ्या चर्चा केल्या जातात परंतु त्या बिनबुडाच्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.