‘पीएम केअर’मधून पुरवलेल्या व्हेंटीलेटर्सची केंद्र अन् राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी : सचिन सावंत
मुंबई: पीएम केअरमधून पुरवलेल्या व्हेंटीलेटर्सची केंद्र अन् राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पीएम केअर्स फंडातून केंद्र सरकारने पुरवलेल्या व्हेंटीलेटर्सच्या सुमार दर्जाबाबत आवाज उचलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हेंटीलेटर्सच्या ऑडिटची घोषणा केली. सदर घोषणा पुरेशी नसून सत्य समोर येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी. या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
याबाबत अधिक माहिती देताना सावंत म्हणाले की, कोरोना काळात पीएम केअर्स या फंडातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार व्हेंटीलेटर्स पुरवत आहेत. मेक इन इंडिया उपक्रमात काही कंपन्यांना हे व्हेंटीलेटर्स बनवण्याचे काम देण्यात आले आहे. गेले वर्षभर विविध राज्यांतून या व्हेंटीलेटर्सच्या दर्जा व उपयुक्ततेच्या बद्दल आक्षेप घेतले गेले. गुजरातमध्येही असेच आक्षेप घेण्यात आले. नुकतेच औरंगाबाद मेडिकल कॉलेजने त्यांना पुरवण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्सच्या दर्जाबाबत अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती, असंही सावंत यांनी सांगितले.
सदर समितीने दिलेला अहवाल अत्यंत गंभीर असून त्यामध्ये ज्योती सीएनसी या गुजरातमधील कंपनीने पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर हे तकलादू आणि निकामी असल्याचा निष्कर्ष काढला. सदर अहवालावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आवाज उठविला आणि या घोटाळ्याच्या राज्य स्तरीय चौकशीची मागणी केली होती. यावर काल केंद्र सरकारने प्रथम धूळफेक करण्याचा प्रयत्न करत सारवासारव केली. पण अखेर जनमानसावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध व जनतेच्या पैशाच्या अपव्ययाविरुद्ध काँग्रेस पक्षाने उचललेल्या आवाजासमोर केंद्र सरकारला आपले पाऊल मागे घ्यावे लागले आणि पंतप्रधानांनी या व्हेंटीलेटर्सच्या ऑडिटची म्हणजेच परीक्षणाची घोषणा केली. पंतप्रधानांनी खरे तर एक वर्षापूर्वी हा निर्णय घेतला पाहिजे होता. त्यातून देशातील लाखो रुग्णांना यांचा फायदा झाला असता आणि अशा तऱ्हेने व्हेंटीलेटर्स रुग्णालयात पडून राहिली नसती. परंतु केवळ लेखापरीक्षण पुरेसे नाही, दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. आणि त्याकरिता चौकशी झाली पाहिजे असे सावंत म्हणाले.
उत्पादक कंपन्याचे गुजरातमधील भाजपा नेत्यांशी चांगले संबंध
उत्पादक कंपन्याचे गुजरातमधील भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत, परंतु त्यांचे व्हेंटीलेटर्स निरुपयोगी असल्याचे सिद्ध होत आहेत. अहमदाबादमधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवली हे कौतुकास्पद आहे. परंतु त्यांचा आवाज ही दाबला गेला. आजही अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी घाबरले आहेत. महाराष्ट्रात अनेक व्हेंटीलेटर्स विनावापर पडून आहेत. नाशिक, औरंगाबाद व इतर ठिकाणी अशीच अवस्था आहे. तरीही केंद्र सरकारने काल सारवासारव केली व औरंगाबाद मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय तज्ञांचा अहवालही धुडकावून लावला. यामुळे सत्य समोर येईल की नाही ही शंका असल्याने केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त ऑडिट लोकहिताचे असेल आणि सत्यतेची हमी त्यातून देता येईल, असे सावंत म्हणाले.