राजकारण

कोकणातील घरेदारे उद्ध्वस्त, केंद्राने तत्काळ मदत करावी: संजय राऊत

मुंबई : कोकणात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेक घरेदारे उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे केंद्राने राज्याला तातडीने मदत केली पाहिजे, असं सांगतानाच संकट पाहता यावेळी केंद्र सरकार राज्याला नक्कीच मदत करेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. कोकणात हजारो लोक पुरात फसले आहेत. घरदार पाण्यात गेले आहे. रस्ते, नाले, पूल उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळीच राज्य केंद्राला मदत मागत असतं. यावेळी संकट पाहता केंद्राकडून नक्कीच मदत मिळेल, असं राऊत म्हणाले.

ऑक्सिजन अभावी एकही व्यक्ती दगावला नसल्याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला जाईल. काही लोक प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने दिलेलं लिखित उत्तर योग्य नाही हे सर्वांना माहीत आहे. मी फक्त महाराष्ट्राबाबत बोलत नाही. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. हे खरं आहे. पण इतर राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले आहेत हे सत्य आहे. पेपरात तशा बातम्या आल्या आहेत. आपण सर्वांनी तो हाहाकार पाहिला आहे. मात्र, तरीही सरकारने लिखित उत्तर दिलं. उत्तर देण्यापूर्वी सरकारने विचार करायला हवा होता, असा टोला राऊत यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button