राजकारण

हिंसाचाराच्या चौकशीसाठी केंद्राचे पथक बंगालमध्ये रवाना

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच हिंसेच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ही बाब केंद्र सरकारनं आता गांभीर्यानं घेतली आहे. आधी केंद्रीय गृह मंत्रालयानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना याबाबत विस्तृत रिपोर्ट मागितला होता. तर, यानंतर आता सरकारनं यासाठी एक समितीही गठित केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या कथित हिंसेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे पथक पश्चिम बंगालला रवाना झालं असल्याचं अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं.

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं, की राज्य सरकारने अहवाल पाठविला नाही तर या प्रकरणात गांभीर्याने विचार केला जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, राज्य सरकारला वेळ न गमावता अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्यासही सांगितले गेले आहे. बंगालमधील कथित हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गृह मंत्रालयाने बुधवारी पाठवलेल्या निवेदनात पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना सांगितलं की, राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत तातडीचा ​​अहवाल मागविण्यात आला होता. पश्चिम बंगाल सरकारने अद्याप अहवाल पाठविला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या पत्रात म्हटलं आहे, की ताज्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना थांबल्या नाहीत आणि याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारने त्याच्या नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचललेली नाहीत.

पत्रात म्हटलं आहे, की वेळ वाया न घालवता या घटना रोखण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज आहे. याचा सविस्तर अहवाल तातडीने गृह मंत्रालयाकडे पाठवावा, असं त्यात म्हटलं गेलं आहे. राज्य सरकारने अहवाल पाठविला नाही तर या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला जाईल, असंही यात स्पष्ट केलं गेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button