Top Newsराजकारण

बळीराजाला सावरण्यासाठी केंद्राने त्वरित भरीव निधी द्यावा : संजय राऊत

मुंबई : राज्यातील नद्या-नाले, धरणे-बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे, तुमच्या त्या केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे वगैरे होतच राहतील, आधी तातडीची मदत म्हणून केंद्राने भरीव अर्थसहाय्य महाराष्ट्राला द्यायला हवे, अशी अपेक्षा शिवसेनेने सामनाच्या आजच्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. ही आपत्ती ज्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे कोसळली ते आता थंडावले आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे संकट कोसळले आणि त्यात शेती, पिकांचे व्हायचे ते नुकसान झालेच आहे. पुन्हा या वादळाचे रूपांतर ‘शाहीन’ या चक्रीवादळात होण्याचा आणि त्यामुळे आणखी काही काळ महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा धोका मराठवाड्याला जास्त सांगितला जात आहे. ही आणखी चिंतेची बाब आहे.

धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे हे दुसरे रूप थरकाप उडविणारे आणि काळजी वाढविणारे आहे.

मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण, बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ६०-७० टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे प्रत्येकी ६ इंच उघडण्याची वेळ या अतिवृष्टीने आली आहे. त्यामुळे प्रतिसेकंद १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत आहे. आधीच गोदावरी अतिवृष्टीने तुडुंब भरलेली; त्यात पाण्याचा हा विसर्ग! म्हणजे गोदाकाठचा संपूर्ण परिसर आणखी काही काळ धोक्याच्या इशाऱ्यातच राहणार हे उघड आहे. निसर्गाची लहर म्हणा किंवा ‘गुलाब’, ‘शाहीन’सारख्या चक्रीवादळामुळे आलेली आपत्ती म्हणा, महाराष्ट्रावर सध्या ‘जलसंकट’च कोसळले आहे.

ऑगस्ट महिन्यात शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला होता. सप्टेंबरमध्ये त्याच पावसाच्या पाण्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. राज्य सरकारतर्फे सर्व परिस्थितीचा आढावा युद्धपातळीवर घेण्यात येत आहेच. मुख्यमंत्र्यांनीही पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत, पण एकंदर स्थितीच आभाळ फाटल्यासारखी आहे. कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरू आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडय़ात हाहाकार उडवला आहे.

मुळात संपूर्ण सप्टेंबर महिना महाराष्ट्र अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर अशाच संकटांखाली भरडला गेला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर ‘निसर्ग’ किंवा ‘तौकते’ चक्रीवादळाप्रमाणे थेट धडकले नाही तर त्याने अतिवृष्टीचा जो तडाखा दिला आहे तो महाभयंकरच आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश अशा सर्वच भागांत या तडाख्याने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे.

एकट्या मराठवाड्यात ३७ जणांचा मृत्यू झाला असून पाच हजारांवर जनावरे दगावली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात महापुराने सुमारे ४५० पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. शिवाय २० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीतून बळीराजाला, सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीतच आहे, पण याची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे, एवढी ही आपत्ती मोठी आहे.

महाराष्ट्र सरकार सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे काम करीतच आहे, पण याची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे, एवढी ही आपत्ती मोठी आहे, राज्यातील नद्या-नाले, धरणे-बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे, तुमच्या त्या केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे वगैरे होतच राहतील, आधी तातडीची मदत म्हणून केंद्राने भरीव अर्थसहाय्य महाराष्ट्राला द्यायला हवे. असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button