नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.
बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळं दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असंही मोदी म्हणाले.
देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे ३ जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी २ दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यापूर्वीच मोदी सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.