आरोग्य

कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार : टोपे

मुंबई : ‘दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले आहेत, लॉकडाऊन केलेलं नाही,’ असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे अर्थचक्राला धक्का बसल्याने राज्यभरातून अनेक घटक सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही शिथिलता आणणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच या कठीण काळात कुणीही राजकारण करू नये, भाजपनेही सहकार्य करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद होण्याची शक्यता

कोरोना संसर्ग पसरण्याचा वेग मोठा असल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आंतरराज्य एसटीची प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारचा खुलासा

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीबाबत जनतेमध्ये संभ्रम तयार होत असतानाच मंगळवारी दुपारपासून सर्वच दुकाने बंद करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. मंगळवारप्रमाणेच आज देखील राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी संघटना यांनी सर्व दुकाने बंद करू नयेत, अशी मागणी करत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर आता दुकानांवरील निर्बंधांबाबत स्पष्टीकरत देत वरिष्ठ आयएएस अधिकारी असीम गुप्ता यांनी एक पत्रक काढलं आहे.

सार्वजनिक वाहतुकीस मान्यता असून काही अटींनुसार वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या संदर्भात मालवाहतूक करणे तसेच दैनंदिन व्यवहारांच्या वापरामधील असणाऱ्या वस्तूंची मालवाहतूक करणे यास परवानगी असल्याचं सांगण्यात आलं आहे. विमान सेवेद्वारे मालवाहतूक सुद्धा सुरू असल्याचं राज्य सरकारने या पत्रकात म्हटलं आहे.

उत्पादन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनाही परवानगी देण्यात आली असून 500 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या ठिकाणी संबंधित उद्योग व्यवसायाने कोव्हिड संदर्भात सर्व उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं सरकारने म्हटलं आहे. तसेच स्वतंत्र विलगीकरण केंद्र देखील या भागांमध्ये सुरू करावे, अशा सूचना देण्यात आल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

कृषीविषयक सर्व व्यवसाय, सर्व कामे यांना परवानगी असून कृषी संबंधित व्यापारी दुकाने देखील खुली ठेवण्यात परवानगी देण्यात आल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. खाद्यपदार्थ, कुक्कुटपालन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यास देखील परवानगी असल्याचे सांगण्यात आलं आहे. पायाभूत सुविधा, स्टॉक एक्सचेंज संबंधित कार्पोरेट कंपन्या यादेखील आता अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असून टेलिकॉम, गॅस या सुविधाही अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येत असल्याचे राज्य सरकारनं स्पष्टीकरण देताना जारी केलेल्या नव्या पत्रकात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button