नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तामिळनाडूमधील २, तर पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी एका जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. ४ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं १६ मे रोजी अकाली निधन झालेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील एक जागा रिक्त झाली होती. नियमानुसार सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक अपेक्षित असते. त्यानुसार आज पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महाराष्ट्रातील या एका जागेसाठी मागच्यावेळी मुकुल वासनिक यांची संधी अगदी थोडक्यात हुकलेली होती. कारण त्यांच्याऐवजी राजीव सातव यांच्या नावाचा विचार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. तथापि, सोनिया गांधी या मुकुल वासनिक यांच्या नावासाठी आग्रही होता. मात्र, राहुल गांधी यांनी त्यावेळी राजीव सातव यांचं नाव पुढे केलं होतं. आता ही राजीव सातव यांच्या अकाली जाण्याने ही जागा रिक्त झाल्याने काँग्रेस कोणाला संधी देतं याची उत्सुकता आहे.
मुकुल वासनिक यांना पुन्हा एकदा संधी मिळतेय की राजीव सातव यांच्या जागी पुन्हा एकदा ओबीसी चेहरा शोधला जातो, हे पाहावं लागेल. कारण, सातव यांच्या घरात त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतंच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यांच्याबाबतीत नेमका काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. तसंच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या देखील राज्यसभेच्या जागेचा प्रश्न आहे. ते नेमके कुठून राज्यसभेत जाणार? की त्यांना महाराष्ट्रातून संधी दिली जातेय हे पाहावं लागेल.