सकाळीची प्रसन्न वेळ आहे. स्नानादी कर्मे आटोपून ‘पिताश्रीं’च्या तसबिरीला नमस्कार करून उधोजीराजे आज कोणकोणत्या व्ही.सी. आहेत याची यादी पाहत आपल्या दिवाणखान्यात निवांत बसले आहेत. त्याचवेळी समोर ठेवलेल्या टीपॉय वरच्या मोबाईलमधून ‘नायक नही खलनायक हुं मै’ ची रिंगटोन वाजते. रिंगटोनवरून कोणाचा फोन असावा हे उधोजीराजे अचूक ओळखतात. या माणसासाठी बाळराजेंनी आपल्याला किती अचूक रिंगटोन सेट करून दिली आहे या विचारासोबतच त्यांचं मन बालराजेंबद्दलच्या कौतुकाने भरून येतं. ते मुद्दामच फोन उचलत नाहीत. परत रिंग वाजते. उधोजीराजे मिश्कीलपणे फोन स्पीकरवर टाकून शांतपणे बसून राहतात.
देवानाना नागपूरकर ( फोनवर) – विठ्ठल विठ्ठल . जय हरी विठ्ठल . विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.
उधोजीराजे ( वैतागून) – जे काही बोलायचं आहे ते जरा नीट आणि लवकर बोला ना. हे काय लावलंय विठ्ठल विठ्ठल ?
देवानाना नागपूरकर (मिश्कीलपणे) – अहो , मला वाटलं मोबाईलला हात लावण्याआधी तुम्ही त्याच्यावर सॅनिटायझर मारत असाल , तोंडावरचा डबल मास्क व्यवस्थित करत असाल, म्हणून तोपर्यंत देवाचं नाव घेत होतो जरा.
उधोजीराजे ( डबल वैतागत) – ही काय पद्धत झाली का देवाचं नाव घेण्याची ?
देवानाना नागपूरकर (शांतपणे) – अहो , ज्या देवाने आपल्यावर कृपा केली त्याचं नाव घेण्यासाठी कसली आली आहे पद्धत ?
उधोजीराजे (कुत्सितपणे) – कसली कृपा केली बुवा देवाने तुमच्यावर , तुमचा मुख्यमंत्री होतोय की काय पश्चिम बंगालमध्ये ? बोलवा आम्हालाही शपथविधीला .
देवानाना नागपूरकर (चिडवत ) – ते पश्चिम बंगाल राहिलं दूर , पण तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना , त्या राज्यात एक पंढरपूर नावाचं विधानसभा क्षेत्र आहे , हे तर माहीतच असेल ना तुम्हाला ?
उधोजीराजे ( आश्चर्य दाखवत ) – अच्छा ! असं आहे का ? ते सांगण्यासाठी फोन केलात की काय ?
देवानाना नागपूरकर ( मिश्कीलपणे ) – नाही . सांगायचं हे होतं , की त्या पंढरपुरात विठ्ठल माऊली आम्हाला पावली ! त्या आनंदात तुमच्याकडे प्रसाद पाठवायचा आहे, विठू माऊलीचा .
उधोजीराजे ( कुत्सितपणे) – असे काय दिवे लावलेत बुवा, की प्रसाद वाटला जातोय ? दिल्लीश्वर नाराज होतील ना, सुतकात प्रसाद वाटला तर ?
देवानाना नागपूरकर ( मिश्कीलपणे ) – अहो , आम्हाला कसलं आलं आहे सुतक ? तिघांच्या ‘ भगीरथ’ प्रयत्नांना मागे टाकत आमच्याकडे ‘समाधान’ नावाचा ‘ माई का लाल’ पैदा झाला आहे ! होतं असं कधी कधी.
उधोजीराजे ( सहजपणे ) – आमचं थोडं दुर्लक्ष झालं म्हणून.आम्ही तिघांनी जर मनापासून प्रयत्न केले असते ना तर अनामत रक्कम परत मिळाल्याचं समाधानही लाभलं नसतं तुम्हाला, समजलं ?
देवानाना नागपूरकर (टवाळीच्या सुरात ) – कागदी वाघ, भिंतीवरचं जुनाट घड्याळ आणि सुरकूतलेला वृद्ध हात एकत्र आले असते तरी काय करू शकले असते, नाही का ? उगाच भ्रमात राहू नका. हा मिनी ‘ करेक्ट कार्यक्रम’ होता , असं समजा. पुढच्या आषाढी एकादशीला विठू माऊलीची पूजा माझ्याच हाताने होणार आहे , याचे संकेत आहेत हे . समजलं ?
उधोजीराजे ( चिडवत) – होईल ना ,तुमच्याच हस्ते होईल . किंबहुना मी तर म्हणतो, की दुसऱ्या कोणाला काय अधिकार आहे तुमच्या घरातल्या विठू माऊलीची पूजा करायचा ? ती तर तुमच्याच हस्ते व्हायला हवी.
देवानाना नागपूरकर ( शांतपणे ) – आषाढी एकादशीची विठू माऊलीची पूजा म्हणजे काय तुम्हाला राज्याचा कारभार वाटला का , घरात बसून करायला ? आणि तुम्हाला मानवणारसुद्धा नाही हो गाभाऱ्यात जाऊन पूजा करायला ! उगाच बालराजेंचा जीव गुदमरायचा आत मध्ये ! नाईट क्लबचा अंधार मानवत असला म्हणून मंदिराच्या गाभऱ्यातला अंधार मानवेलच असं काही नसतं !
उधोजीराजे ( चिडून) – मला वाटतं तुमचं बोलणं विषय सोडून भरकटत चाललं आहे . कामाचं काय ते बोला. काही कामाचं विचारायचं असेल तर विचारा लवकर .
देवानाना नागपूरकर ( शांतपणे) – एक दोन शंका आहेत. रागावणार नसाल तर विचारू ?
उधोजीराजे ( संयम राखत) -विचारा.
देवानाना नागपूरकर ( मिश्कीलपणे ) – असं एकटंच पाडायचं होतं , तर ‘आमच्या दादांना’ परत का बोलावलं होतं आणि ‘ तुमच्या ताई’ राजभवनावर का गेल्या होत्या ?
(संपर्क ७८७५० ७७७२८)