राजकारण

महावसूली बोंब ठोकणारा भाजपच वसुलीबाज; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

भाजपच्या पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकारणी अटक

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे वसूलीबाज सरकार अशा घोषणा भाजपकडून देण्यात येतात. मात्र महावसूली अशा बोंबा मारणारा भाजप वसूलीबाज सिद्ध झालाय असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नितीन लांडगेंच्या अटकेवरुन सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवरुन सचिन सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यांना नितीन लांडगे यांच्यासह ६ जणांना एसीबीने अटक केली आहे. महाविकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा आरोप करणाऱ्या भाजपमधील नेत्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाली. यावरुन सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मोदी सरकारच्या दबावाने काही जणांना आरोप करायला लावून महावसूली महावसूली अशी बोंब ठोकत मविआ सरकारची बदनामी करणारा भाजपाच वसूलीबाज सिध्द! भाजपाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष नितीन लांडगे याला सहा जणांसहीत लाचखोरीच्या आरोपांखाली अटक झाली आहे, अशी खोचक टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची व्हिसीद्वारे बैठक सुरु होती. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळेंसह मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. इतर अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते. एसीबीने महानगरपालिकेत सापळा रचला होता. बुधवारी पाचच्या सुमारास मुख्य लिपिक पिंगळे पालिकेच्या पार्किंगमध्ये एका तक्रारदराकडून काही लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने पिंगळेंना स्थायी समितीच्या कार्यालयात नेत कार्यालयाचा ताबा घेतला. दोन तासांच्या चौकशीनंतर एसीबीने स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. एसीबीची कारवाई झाल्यानंतर संपुर्ण शहरात वाऱ्यासारखी बातमी परल्यामुळे खळबळ माजली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button