बंगलोर : देशात फक्त २९ कोटी नागरिकांना म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी फक्त २१ टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. असे असतानाही नागरिकांना १०० कोटी डोस दिल्याचा भाजपने साजरा केलेला उत्सव हा भंपकपणा आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.
सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, देशात आजवर नागरिकांना १०० कोटी डोस दिले आहेत असे केंद्र सरकार सांगते; पण त्यांतील किती लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले व किती लोकांना अद्याप केवळ एकच डोस मिळाला, याचीही आकडेवारी सरकारने ठळकपणे जाहीर करायला हवी होती. देशातील १३९ कोटी जनतेपैकी फक्त २९ कोटी लोकांना दोन्ही डोस मिळणे, ही फार आदर्श स्थिती नाही.
सिद्धरामय्या म्हणाले की, देशातील फक्त २१ टक्के लोकांना दोन्ही डोस दिल्याबद्दलचा हा उत्सव आहे का? अमेरिकेत ५६ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. चीनमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे. त्या तुलनेत भारतामधील लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, कोरोना साथ अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. कोरोना लसीच्या दोन डोसनंतर कदाचित बूस्टर डोसचीही गरज लागू शकते. अजूनही अनेक लोकांनी कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोसही घेतलेला नाही. त्यामुळे उत्सव साजरे न करता लसीकरण मोहिमेवर केंद्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.