राजकारण

अनिल देशमुखांवर भाजपची टीका

मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे असलेल्या ईडीचा ससेमिरा अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यासाठी अनिल देशमुखांना नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवार, २९ जून रोजी प्रत्यक्ष चौकशीसाठी अनिल देशमुख यांना उपस्थित राहण्यास ईडीकडून सांगण्यात आले होते. मात्र, वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

तेव्हा वय, आजारपण आठवलं नाही. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबई नागपूर विशेष विमान फेऱ्या सुरू होत्या तेव्हा वय, आजारपण हे अनिल देशमुख यांना आठवत नव्हतं आता मुंबईतून ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवयाला लागले, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

प्रत्यक्ष चौकशीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. अनिल देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असे ईडीने अनिल देशमुख यांना म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button