मुंबई : कोरोना संकटात देशाची स्थिती चिंताजनक झाली आहे. केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी झाल्यामुळे काँग्रेसवर खोटे आरोप केले जात असल्याचा खुलासा काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटच्या सहाय्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करत असल्याचा आरोप केला होता. हे टुलकिट बनावट असल्याचे समोर आले आहे. अल्ट न्यूजच्या खुलाशानुसार बनावट लेटरहेडवर हे टूलकिट बनवले गेले असल्याचे समोर आले आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपचा खोटेपणा पुन्हा उघडकीस आणला आहे. काँग्रेसवर टुलकिटच्या सहाय्याने मोदींची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला होता. अल्ट न्यूजने दिलेल्या माहितीला ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचे कुटील कारस्थान उघड झाले आहे. अल्ट न्यूजच्या खुलाशानुसार एका बनावट पद्धतीने बनवलेल्या लेटरहेड वर हे टूलकिट बनवण्यात आले आहे. भाजपला मूळ कागद दाखवण्यासाठी सांगितल्यास त्यांनी दाखवले नाही. या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनायक मेटे आणि अतुल भातखळकर यांचा खोटेपणा पुन्हा उघडकीस आला असल्याचे म्हटले आहे.
भाजपा नेत्यांचे कुटील कारस्थान उघड- @AltNews च्या या खुलाश्यानुसार एका बनावट पध्दतीने बनवलेल्या लेटरहेड वर हे टूलकिट बनवले गेले. भाजपाला मूळ कागद दाखवायला सांगितले असता त्यांनी ते दाखवले नाही. @ChDadaPatil @Dev_Fadnavis @vinay1011 आणि @BhatkhalkarA यांचाही खोटेपणा पुन्हा उघडकीस https://t.co/FEw6nZ4GJR
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 19, 2021
टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. सदर टुलकिट हे बनावट आहे. राष्ट्रीय काँग्रेसतर्फे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा व संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामध्ये अतुल भातखळकर यांचेही नाव देऊ असे म्हटले होते. तसेच मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे. असे सचिन सावंत यांनी म्हटले होते.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी एका टूलकिटचा उल्लेख केला आहे. या टूलकिटचा वापर करुन काँग्रेस भाजप आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कोरोनाच्या इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणून उल्लेख करत आहे. तसेच कुंभमेळा कोरोनाचा सुपरस्प्रेडर असल्याचे सांगायचे आहे. यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांना प्रचार करण्यास सांगितलंय असा आरोप संबित पात्रा यांनी केला आहे.
काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना परिस्थितीत अपयश लपवण्यासाठी आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी भाजपने देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि संबित पात्रा व बी.एल.संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने पत्रातून केली आहे.