Top Newsराजकारण

तेल टाकून आग भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र; राज्यातील दंगलीवरून पवारांचा हल्लाबोल

नागपूर: त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चढवला.

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हा टोला लगावला. सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय. जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.

स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ८० टक्के लोक शेती करत होते. तेव्हा ३५ कोटी लोक संख्या होती. आता ११२ कोटी लोकसंख्या आणि ६० टक्के लोक शेती करत आहेत. म्हणजे शेतीवरचा लोकांचा भार अडीच पटीने वाढला आणि जमिनीवरचा कमी झाला. आपण विकासाची कार्यक्रम हाती घेतो. कोणताही कार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर जमिनीची गरज असते. त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत असून शेतकऱ्यांवर ताण येत आहे, असं त्यांनी सांगितलं. विकास कामात जमिनी हव्या असल्याने शेतीची जमीन उद्योगाला देण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव येत आहे, असंही त्यांनी सांगितलं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं. पण शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. जर संसदेत सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर देशभर शेतकरी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

…तर आत्राम यांनाच लोकसभेची उमेदवारी

अहेरी विधानसभा मतदारसंघाची तिकीट धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना देऊ असं सांगतानाच गडचिरोली लोकसभा जागा मिळाली तर धर्मरावबाबा आत्राम यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही, असं त्यांनी जाहीर केलं.

अनिल देशमुखांच्या अटकेची किंमत भाजपला चुकवावी लागेल

नागपूरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळावायत भाजपवर घणाघात केला आहे. अनिल देशमुखांच्या अटकेचा एक-एक मिनीट वसूल करु असा थेट इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे आरोप करुन अनिल देशमुख यांना अडकवले आहे. यासाठी भाजपची त्यांनी मदत घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित नसल्याची खंत व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांमध्ये आजचा असा पहिला दिवस आहे की नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडलं नव्हतं. अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत वसूल झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकार हे एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही तर सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातूनच दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कसं घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले.

आरोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले की, दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला व त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख आत आहेत. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडते असे शरद पवार म्हणाले.

सोमय्यांवर निशाणा

राज्यातील नेत्यांवर आरोप करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्यांवर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. काही अस्वस्थ लोक याद्या तयार करून दिल्लीला पाठवतात आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात असे पवार म्हणाले. राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button