भाजप देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान : नरेंद्र मोदी
भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
नवी दिल्ली : निवडणुकांमधील विजयावरून भाजपावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भाजपा निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांची, योजनांची माहिती देतानाच मोदी यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली. काहींसाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे योजना आणि मते मिळण्याचे माध्यम बनले आहे, त्यामुळे याविषयाला राजकीय वळण मिळत आहे. परंतु विरोधक याला कम्युनल बोलतात. आजकाल चुकीच्या पद्धतीने गोष्टी समोर आणल्या जातात, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सीएए कायदा, कृषी कायदा आणि कामगार कायद्याविरोधातही लोकांना भडकवण्यात आले. यामागे विचारपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. भाजपा संविधानात बदल करतोय, नागरिकता काढून घेतोय, शेतकऱ्यांची जमीन लुटतोय असा विरोधकांचा आरोप आहे. आपला पराजय न स्वीकारणारे भाजपाचे शत्रुच अशाप्रकारची कामे करु शकतात. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सावध राहणे गरजेचे आहे असे म्हणत विरोधकांवर खरमरीत ठीका केली.
मागील वर्षी करोनानं संपूर्ण देशसमोर अभूतपूर्व असं संकट उभं केलं होतं. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपलं सुख-दुःख विसरून देशवासियांची सेवा केली. ‘सेवा हेच संघटन’ याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केलं. गांधीजी म्हणायचे समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला लाभ होईल तेच निर्णय आणि योजना आहे. गांधींजींच्या त्याच भावनेला पूर्ण करण्यासाठी आपण परिश्रम घेत आहोत, असं मोदी म्हणाले.
आमच्या सरकारचं मूल्याकंन लोकांना दिल्या जाणार लाभावरून होत केलं जात आहे. देशातील सरकारच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्याचा हा मूलमंत्र बनला आहे. मात्र, तरीही भाजपा निवडणूक जिंकली की, तर भाजपाला निवडणूक जिंकण्याचं मशीन म्हटलं जातं. जर इतर पक्ष निवडणूक जिंकला तर त्याचं कौतूक केलं जातं आणि भाजपा जिंकली तर निवडणूक जिंकण्याची मशीन? असं म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची परिपक्वता कळालेली नाही. या लोकांना भारतीयांच्या आशा अपेक्षांना समजत नाहीये. भाजपा सत्तेत असो वा विरोधी बाकांवर जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. कार्यकर्ते भाजपाला ताकद देतात. जनतेमध्ये राहून काम करतात. पक्षाची ताकद वाढवतात. आपलं आचरण आणि प्रयत्नांनी भाजपा कार्यकर्ते जनतेचं मन जिंकण्याचं काम अविरतपणे करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
केरळ आणि बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले. घराणेशाहीचं काय हाल झाले आहेत? हा नवा भारत बघत आहे. प्रादेशिक पक्षही एक कुटुंब आणि काही लोकांपुरतीच मर्यादित झाले आहेत. या पक्षांनी समाजवादाचा बुरखा पांघरलेला होता. तो फाटला आहे. त्यांच्या समाजवादाचा अर्थ काही लोकांसाठी योजना आणि व्होट बॅंकेसाठी धोरणं आखणं इतकाच होता. हेच पक्ष आता कृषी कायदे आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.