राजकारण

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजप ५० जागाही जिंकू शकला नसता : ममता बॅनर्जी

कोलकाता: निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही २२१ चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप ७० पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

नंदीग्राम मतदारसंघात माझा अजून पराभव झालेला नाही. आम्ही त्याठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्याठिकाणी काही फेरफार करण्यात आले आहेत. मतदानाच्यादिवशीही मी नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्राबाहेर तीन तास बसून होते. कारण त्याठिकाणी लोकांना मतदान करुन दिले जात नव्हते. मात्र, नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी न्यायालयात जाणार का, याविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button