भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे “मिशन गोवा”!
वास्को: गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा दाबोळी विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मंत्री व भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. शनिवार व रविवार असे दोन दिवस जे.पी.नड्डा गोव्यात असणार आहेत. यादरम्यान ते गोव्याचे मंत्री, भाजपा आमदार, भाजपा मंडळ अध्यक्ष व इतर भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
जे. पी. नड्डा यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, नगरविकासमंत्री मिलींद नाईक, विनय तेंडुलकर, माजी आमदार दामू नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले असून या काळात ते भाजपा पदाधिकारी – कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याबरोबरच ते एका वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
रविवारी ते भाजपा कार्यकर्त्यांसहीत ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली. जे. पी. नड्डा यांच्या या भेटीदरम्यान त्यांच्याशी पुढच्या सात महिन्यानंतर होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीबाबत विविध विषयावर भाजपा नेत्यांची चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या आगमनावेळी शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर उपस्थिती लावली होती व त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.