राजकारण

ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजप आणि फडणवीसांचा डाव : नाना पटोले

मुंबई : केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक इंधनदरवाढ, त्यामुळे वाढलेली महागाई, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, फडणवीस सरकारच्या काळातला महाऑनलाईन घोटाळा, मराठा आरक्षण प्रकरणातील केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरु असलेली लूट, अशा मुद्द्यांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असून त्यासाठीच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझेंचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही. असे असतानाही विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक वाझेंचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुद्दामहून वाझेंचे नाव घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांकडून सुरु आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून मुकेश अंबानी यांची अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कशी काय जाऊ शकते, असेही पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button