नवी दिल्ली : गांधी घराण्यातील नेते आणि भाजप खासदार वरुण गांधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान चर्चा पुढे जाऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीएसमधून बसपमध्ये दाखल झालेले खासदार दानिश अली देखील टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात. विशेष म्हणजे वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांची आई मनेका गांधी आणि त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.
तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, ते आता भाजप सोडण्याचा विचार करत आहेत. अशा स्थितीत त्यांना नव्या राजकीय व्यासपीठाची गरज भासणार आहे. काँग्रेसमध्ये जाणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत ते तृणमूलच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे वरुण गांधी यांनी नुकताच लखीमपूर हिंसाचाराचा निषेध केला होता. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त नथुराम गोडसेविरोधातही आवाज उठवला होता.
खरे तर त्रिपुरा आणि गोव्यानंतर तृणमूल काँग्रेस उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर या आणखी तीन राज्यांमध्ये संघटनात्मक विस्ताराच्या तयारीत आहे. या संदर्भात त्या राज्यांमधून तृणमूलमध्ये सामील झालेल्या विविध पक्षांच्या नेत्यांनाही राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो २९ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे आले होते आणि आपल्या समर्थकांसह तृणमूलमध्ये सामील झाले होते. त्यांची तृणमूलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.