ठाकरे सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल; भातखळकरांचा खोचक टोला
मुंबई: पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका केली आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भातखळकर यांनी मुंबई तुंबल्याने सरकारवर निशाणा साधला. महापालिकेने मुंबई तुंबून दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगत होतो, ते आज उघड झालं आहे, असं सांगतानाच राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील. मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं त्यांनी म्हणू नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी करून नालेसफाई नीट करा. जे पाणी तुंबण्याचे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करा, असा आमचा पालिका आयुक्तांना सल्ला राहील, असंही ते म्हणाले.