राजकारण

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात : आशिष शेलार

मुंबई : पब, डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याचं म्हणत आमदार आशिष शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. “गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली आज जाहीर केली. कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरु होते तेव्हा पासून मूर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले, असं शेलार म्हणाले.

कुणाशीही चर्चा न करता सर्वसमावेशक भूमिका न घेता सरकारने आता नियमावली जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मूर्ती २ फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मूर्तीचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का? गतवर्षीपासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. असा एकतर्फी निर्णय लोकशाहीत मान्य नाही. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. जर बंधने घालण्यात येणार असतील तर मूर्तीकरांना मदतीचे पँकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाचे नियम पाळणे सर्वांनाच मान्य आहे. त्यासाठी सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, कोरोनाचा फैलाव रोखणे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्या कोणी नाकारत नाहीत. पण घातलेले निर्बंध असे आहेत त्यातून उत्सवाची परंपरा कशी राखली जाणार? गणेशोत्सवाची शंभर वर्षांपासूनची परंपरा खंडित होता कामा नये यासाठी सरकार काळजी घेताना दिसत नाही, असंही शेलार यांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button