मुंबई: मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी भाजप खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. संभाजी छत्रपती यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच आता भाजपचे इतर मराठा नेतेही राज्यभर दौरा करणार आहेत. प्रत्येक नेता जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणावरील पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे भाजपच्या या मराठा अस्त्राला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरे काढून मराठा समाजाच्या भावना समजून घ्यायला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेही आता पक्षातील मराठा नेत्यांना कामाला लावले आहे.
भाजपने पक्षातील सर्व मराठा नेत्यांना जिल्हावार दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. हे मराठा नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला भाजपची भूमिका समजावून सांगतील. कोर्टात नेमकं काय घडलं? सरकार कुठे चुकलं? आदी मुद्देही भाजपचे नेते मराठा समाजाला समजावून सांगणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपचे खासदार नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, नरेंद्र पाटील आदी नेते जिल्हावार दौरा करणार आहेत. प्रत्येक नेत्याला जिल्हा वाटून देण्यात आला आहे. त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाची सविस्तर भूमिका मांडण्याचं काम हे नेते करणार आहेत.
त्यानुसार प्रवीण दरेकर – रायगड, प्रसाद लाड – रत्नागिरी, रवींद्र चव्हाण – सिंधुदुर्ग, आशिष शेलार – नांदेड, बीड, नारायण राणे – पुणे, ठाणे, हर्षवर्धन पाटील – सातारा, संभाजी पाटील निलंगेकर – औरंगाबाद, जालना, नरेंद्र पाटील- अकोला, बुलढाणा जिल्ह्यात जाऊन भाजपची भूमिका स्पष्ट करणार आहेत.