Top Newsराजकारण

बंगालमध्ये भाजपसमोर फूट रोखण्याचे मोठे आव्हान

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपल्या, निकाल लागला पण राजकीय घडामोडी अजूनही घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बंगाल भाजपात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जे तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपात गेले, निवडून आले, आमदार झाले ते आता पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. घडामोडी एवढ्या वेगानं घडतायत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता भाजपत गेलेल्या मुकूल रॉय यांना फोन केला.

मुकूल रॉय यांच्या पत्नी कृष्णा रॉय यांना काही दिवसांपुर्वी कोविड झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. २१ दिवसांपासून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कृष्णा रॉय यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे सेकंड इन कमांड अभिषेक बॅनर्जी थेट अपोलो हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतरच बंगाल भाजपात भूकंप होणार अशा चर्चेला उधान आलं आहे. अभिषेक बॅनर्जीच्या भेटीनं भाजपा खडबडून जागी झाली. एवढी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट मुकूल रॉय यांना फोन करुन कृष्णा रॉय यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हवी ती सगळी मदत करण्याचं रॉय यांना मोदींनी आश्वासनही दिलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी मनमोहनसिंग सरकारमधून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी मुकूल रॉय यांची केंद्रीय रेल्वे मंत्रीपदी वर्णी लागली. बंगालमधूनच रॉय दोन वेळेस राज्यसभेवरही गेले. पण काही दिवसातच त्यांचे ममता बॅनर्जींशी मतभेद झाले. तृणमूल काँग्रेस विरोधी कारवाया केल्या म्हणून सहा वर्षासाठी त्यांना पार्टीतून निलंबित केलं गेलं. रॉय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सीबीआय चौकशी लागली. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. भाजपानं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपाकडून आमदारही झाले. ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि आमदार झालेले अनेक जण तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यासाठी हालचाली करत असल्याची चर्चा आहे. काहींनी उघडपणे ममता बॅनर्जीसोबत जायची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातच मुकूल रॉय यांचंही नाव घरवापसीच्या चर्चेत आहे.

मुकूल रॉय यांच्या मुलाचं नाव आहे शुभ्रांगसू रॉय. ममता सत्तेवर आल्यानंतर अनेक भाजपा नेते त्यांच्यावर टिकाटिप्पणी करतायत. मुख्य सचिवांवर मोदी आणि ममता सरकारममध्ये झालेला वाद अगदी ताजा आहे. रॉय यांच्या मुलानं ट्विट केलं की, प्रचंड बहुमतानं पुन्हा सत्तेवर आलेल्या ममता सरकारवर टीका करण्यापेक्षा आपण सेल्फ असेसमेंट करावं. आपलं काय चुकलं ते शोधावं. रॉय यांच्या मुलाच्या ह्या ट्विटनंतरच दुसऱ्या दिवशी अभिषेक बॅनर्जी कृष्णा रॉय यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले.

पंतप्रधान मोदींनी फोन केल्यानंतर मुकूल रॉय यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिषेक बॅनर्जी यांनी मात्र कृष्णा रॉय भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी मुकूल रॉय यांच्या पत्नी म्हणून भेट घेतलेली नाही. कृष्णा रॉय यांचा मी आईसारखा आदर करतो म्हणून भेट घेतल्याचं अभिषेक बॅनर्जींचं म्हणणं आहे.

मोदी आणि शाह यांनी सर्वस्व पणाला लावल्यानंतरही बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दणदणीत यश मिळालं. विशेष म्हणजे ममतांना सोडून अनेकांनी भाजपात प्रवेश केला. पण भाजपा ममतांचा विजय रथ रोखू शकले नाहीत. ममतांना ज्याप्रमाणं यश मिळालं आहे ते पहाता ममतांचं नाणं अजूनही खणखणीत असल्याचं दिसतं. परिणामी भाजपचे आमदार फुटून पुन्हा ममतांसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बंगालमध्ये पक्ष फुट रोखण्याचं मोठं आव्हान भाजपासमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button