मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात येत नाहीत, ते घरकोंबडे आहेत अशा आरोपांच्या फैरी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यापासून खालच्या फळीतील केशव उपाध्ये, निरंजन डावखरे, माधव भांडारी, प्रसाद लाड यांच्याकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र या नेत्यांच्या टीकेत काडीमात्र तथ्य नसल्याचे दिसून येते. कारण मुख्यमंत्री कार्यालयात जाणाऱ्या गुरुवारपर्यंतच्या सर्व फाईल्सचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारी असतानाही निपटारा केल्याचे वास्तव आहे.
अगदी आजच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, निरंजन डावखरे यांनी ठाण्यात, तर माधव भांडारी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन एकाच मागणी केली. पवारांवर विशेष नसेल तर लेखाच्या सचिवांकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा अशी मागणी या नेत्यांनी केली. यापूर्वी याच भाजपच्या नेत्यांनी कधी रश्मी ठाकरे, कधी आदित्य ठाकरे, तर कधी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्याची मागणी करून अत्यंत विखारी भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरु ठेवला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या गुरुवार, दि. १३ जानेवारी २०२२ पर्यंतच्या सर्व फाईल्सचा निपटारा केल्याचे दिसून येते. अगदी ते आजारी असतानाही त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रशासकीय अधिकारीच कबूल करत आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयात दररोज २५ ते ५० च्या दरम्यान फाईल्स येत असतात. आठवड्याच्या सुरवातीला म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवारी सर्वच मंत्री मुंबईत असतात. त्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या फाईल्सची संख्या अधिक असते. तरीही मुख्यमंत्री कोणतेही काम पेंडिंग ठेवत नसल्याचे प्रशासकीय अधिकारी खासगीत कबूल करतात.
कोणत्याची फाईलवर सही करण्यापूर्वी चुकीच्या फाईलवर सही होणार नाही, प्रत्येक गोष्ट तपासून घेणे असे अनंत आणि किचकट सोपस्कार पूर्ण करून मुख्यमंत्र्यांवर सही करण्याची जबाबदारी असते. असे असतानाची सर्व फाईल्सचा निपटारा होत असल्याचे वास्तव आहे. असे असताना भाजप नेते व्यक्तिगत द्वेषातून उद्धव ठाकरेंवर विखारी टीका करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेमुळेच त्यांना सत्ता गमवावी लागल्याचे शल्य असल्याचे भाजप नेत्यांचे प्रत्येक कृतीतून दिसून येते. याउलट देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक महत्वाच्या पदांवर खासगी व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्या काळात या लोकांचा दैनंदिन कामात हस्तक्षेप अधिक होता आणि फडणवीसांनी सर्वच निर्णय आपल्याकडे केंद्रित करून ठेवले होते. याउलट उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री कार्यालयात खासगी व्यक्तींच्या नियुक्त्या न करता अनुभवी आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांकडूनच कामे होत आहेत.
याशिवाय फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा आपल्याच मंत्र्यांवर विश्वास नव्हता. त्यांनी सर्व मंत्र्यांचे अधिकार स्वतःच्या हातात एकवटून ठेवले होते. फडणवीस आपल्या सहकारी मंत्र्यांना स्वातंत्र्य देत नसल्याची खंत त्यांचेच नेते बोलून दाखवतात. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा घोषा करूनही फडणवीसांना आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने भाजप नेते ठरवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका करत असल्याचे, राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.