Top Newsराजकारण

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आक्रमक

मुंबई – क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला. नवाब मलिक यांचे मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी आर्थिक संबंध आहेत, असे फडणवीस यांनी कागदपत्रांचा दाखला देत सांगितले. त्यानंतर, भाजप नेत्यांनीही महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनीही शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!

बॅाम्ब ब्लास्टमध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांशी, महाराष्ट्राच्या जनतेशी, मराठी माणसाशी या सरकारं केलेला हा विश्वासघात आहे. देशवासियांच्या पाठीत महाविकास आघाडीकडून खंजीर खुपसला गेलाय, अशी बोचरी टीका भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच, महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!, असेही त्यांनी ट्विट करुन म्हटलंय. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलीय. १९९३ बॅाम्ब ब्लास्टमधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असा खोचक टोलाही वाघ यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेला आता बॉम्बस्फोट आरोपींशी झालेल्या व्यवहाराचेही समर्थन करावे लागणार… काय करणार, सत्ता टिकवायची आहे ना!, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. तसेच, १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे नवाब मलिक यांच्याशी साटेलोटे आहे, असेही त्यांनी म्हटलंय.

सलीम पटेल कुख्यात गुंड असल्याचं मला माहिती नाही, मलिकांनी आरोप फेटाळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खळबळ उडवून दिली. मात्र, आता नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हहटले. तसेच, त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. सलीम पटेल आणि सरदार वली खान यांच्याशी झालेल्या व्यवहाराची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत भाडेकरूचे मालक व्हा, मुख्यमंत्री ठाकरेंनी नवीन अध्यादेश काढावा

फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलीक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा पलटवार भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणी ही आमदार आशिष शेलार यांनी केली. हे जे समोर मांडून ठेवलंय ते जर खोटंय असं वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी एक शासन निर्णयच काढावा. यापुढे मुंबईत प्रत्येक भाडेकरूला आपल्या जागेच्या किंमतीच्या १० टक्के पैसे भरा आणि केवळ आपल्या गाळ्याचे जागेचे नाही तर इमारतीचे मालक व्हा, असा जीआरच काढून टाकावा, असा उपरोधात्मक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या २५ टक्के रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या हास्यास्पद बाबी समोर आणल्या.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. तसेच, मुख्यंत्र्यांनी आता मलिकांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button