हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; खंदे समर्थक भरत शाह सर्व पदांवरून पायउतार
इंदापूर (पुणे) : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक भरत शाह यांनी तडकाफडकी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या घरगुती कारणांसाठी शाह यांनी हा राजीनामा दिला असल्याचे ते सांगत आहेत. मात्र यात मोठे राजकारण दडल्याची चर्चा आहे.
इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक इत्यादी पदावर ते सध्या कार्यरत होते. शाह यांच्या राजीनाम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. भरत शाह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी भरत शाह यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्ता भरणे विरुद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं वैर राज्याला परिचीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमुळे दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे.
2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढवली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. मात्र आता यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत लोकसभेसह विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत याबाबत एकमत झालं होतं. त्यामुळं इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच राहणार की काँग्रेसला दिली जाणार याबाबत संभ्रमाची परिस्थिती होती. त्यातच राष्ट्रवादीकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकीवेळी आघाडी केली जाते आणि विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीकडून घात केला जातो, असा सूर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटतोय.