सुनील माने-शिवसेना संबंधांची चौकशी करा; भाजपचे ‘एनआयए’ला पत्र
मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांच्या शिवसेना संबंधाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी तसे पत्रच एनआयएच्या महासंचालकांना लिहिलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करण्याची करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुनील माने यांचे शिवसेना कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक होते. इतकेच नव्हे तर सुनील माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार केला होता. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्यांच्याशी सुद्धा माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध और पानी का पानी’ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी एनआयएला पत्र लिहून ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितलं.