Top Newsराजकारण

भाजप आणि प्रवीण दरेकर विकृत विचारांचे; राष्ट्रवादीत संतापाची लाट

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. १६ सप्टेंबरला लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य दरेकरांनी केलं होतं. काल पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी यावेळी केला होता.

दरेकरांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पक्षाच्या नेत्यांनी दरेकरांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर पक्षाच्या चित्रपट आाणि सांस्कृतिक विभागाने दरेकरांच्या या वक्तव्यावर अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरेकरांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी चित्रपट विभागाने चांगलाच समाचार घेतला आहे. ऐन गौरी-गणपती उत्सवात दरेकरांनी केलेलं हे वक्तव्य कलाक्षेत्रातील महिलांसह तमाम मातृशक्तीचा अपमान करणारे असल्याचं राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. या वक्तव्यातून भाजपची महिलांसंदर्भातील मनुवादी आणि विकृत मानसिकता दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक चित्रपट कलाकार प्रवेश करीत आहेत. निव्वळ ‘चमकोगिरी’ करीत ‘अच्छे दिन’च्या भुलभुलैय्यात हे कलाकार फसत नसल्यानेच भाजपचा जळफळाट होत असल्याचे पाटील म्हणालेत. सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकरांमधील ही वैचारिक विकृती बाहेर आल्याची टीका राष्ट्रवादी चित्रपट विभागाने केली आहे.

हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीसांबाबतीतही दरेकरांचे विचार हेच का?

भाजपमध्येही कलाक्षेत्राला समृद्ध करणाऱ्या अनेक महिला कलाकार आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा राष्ट्रवादी काँग्रेसला आदर आणि अभिमानच आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, खासदार हेमा मालिनी अशा दिग्गज महिला आहेत. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा नामवंत गायिका आहेत. अनेक अल्बममध्ये अभिनयसुद्धा केला आहे. या महिलांच्यासंदर्भातही भाजप आणि प्रवीण दरेकरांची ही ‘मुका’ संस्कृतीची भावना कायम आहे का?, असा सवाल बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.

माफी मागा, नाहीतर गाल रंगवू : बाबासाहेब पाटील

प्रवीण दरेकरांनी आपल्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मातृशक्तीसह कलाक्षेत्रातील सर्व महिला आणि सुरेखा पुणेकर यांची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट विभागाने केली आहे. यासंदर्भात दरेकरांनी माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दरेकरांचे गाल लाल करतील असा गर्भित इशाराच यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. यासोबतच प्रवीण दरेकरांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरेकरांच्या या कथित वक्तव्यानंतर राज्यभरात भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, राजकीय टीका करतांना राजकीय नेत्यांच्या भाषेतला हरवत असलेला सुसंस्कृतपणा पुरोगामी आणि महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button